विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
नाशिक – शहरभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच पंचवटीतील गजबजलेल्या मालेगाव स्टँड परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथे गेल्या तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या एका मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच घबराट पसरली.
डोक्याला गंभीर मार, रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव स्टँड येथे उभी असलेली एमएच १५ जीआर ८९७४ क्रमांकाची मारुती ओमनी व्हॅन स्थानिकांच्या नजरेस आली. गाडीच्या मागील दोन सीटमधील मोकळ्या भागात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर जखम असून, वाहनाच्या आतून बाहेर रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ वाहत आलेले स्पष्टपणे दिसत होते. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
तळेगाव येथील व्यक्तीची गाडी असल्याची माहिती
प्राथमिक तपासात ही व्हॅन तळेगाव, महिरावणी येथील रहिवासी मोहन भैरू भगत यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सव काळात मालेगाव स्टँड आणि पंचवटी परिसरात रात्रभर भाविकांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी तीन दिवसांपासून ही संशयास्पद व्हॅन उभी असतानाही ती कोणाच्याही लक्षात कशी आली नाही, यावरून नागरिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पोलिसांकडून पंचनामा, ओळख पटवण्याचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या मृताची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
