विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
नाशिक – अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा गणपतीचे दर्शन करून येतो, असे सांगून दुकानातून बाहेर पडलेल्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह ठाणे खाडीत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मुकेश गोवर्धनदास ओबेराय (वय ४६, रा. समर्थ नगर, नाशिक) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. ते दि. १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होते.
नेमकं काय घडलं?
मुकेश ओबेराय हे दुकानातून गणपती दर्शनासाठी जातो असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांची चिंता वाढली. सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांचे बंधू मनिष ओबेराय यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच सरकारवाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संभाव्य प्रवास मार्गांची तांत्रिक तपासणी सुरू केली. तपासात ओबेराय यांचे लोकेशन ठाण्याच्या दिशेने असल्याचे समोर आले. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने ठाण्याला रवाना झाले. तेथे ठाणे खाडी परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांच्या मदतीने ओळख पटवली असता तो मृतदेह मुकेश ओबेराय यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
ही माहिती शनिवारी (दि. १९) उशिरा मिळताच नाशिक शहरात आणि औषध व्यवसाय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
आत्महत्येचा प्राथमिक संशय – कौटुंबिक आजारपणाचे कारण?
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ओबेराय यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून तीव्र आजारपणाची समस्या सुरू होती. घरातील जबाबदाऱ्या, वैद्यकीय उपचारांचा वाढता आर्थिक व मानसिक ताण यामुळे ते सतत चिंतेत आणि तणावाखाली होते. याच मानसिक विवंचनेतून त्यांनी ठाणे गाठून खाडीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेबाबत ठाणे पोलिस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात या घटनेची अधिकृत नोंद केली जात आहे.
ओबेराय यांनी नाशिक सोडल्यापासून ते ठाणे खाडीपर्यंत केलेला प्रवास, त्यांची नेमकी मनस्थिती आणि आत्महत्येमागचे अचूक कारण स्पष्ट व्हावे यासाठी सरकारवाडा आणि ठाणे पोलिस संयुक्तपणे अधिक तपास करत आहेत.
