जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मुक्ताईनगर : पावसातील प्रदीर्घ खंडामुळे तालुक्यातील शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले असून, मुक्ताईनगर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकरी व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद एकनाथ पाटील यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा पदरमोड करून बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत व मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट झाली असून, केलेला खर्चही भरून निघेल एवढे उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने पशुधनाच्या संगोपनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतपातळीवर सर्वेक्षण करून वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या
१) तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा.
२) नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनामे करावेत.
३) शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीकविमा नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
४) पशुधनासाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात.
५) शेतकरी व पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करून गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा करावा.
६) तालुक्यातील वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकारी व शासनाकडे तातडीने सादर करावा.
“पिके हातातून जाण्यापूर्वी आणि पशुधनावरील संकट अधिक गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
