जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांसाठी नारळाच्या काथ्यापासून कोकोपीट निर्मितीचा नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.

घरातील टाकाऊ नारळाच्या काथ्यांचा उपयोग करून त्यापासून रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त कोकोपीट तयार करता येते, याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. ‘कचरा नाही, संसाधन आहे’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी घराघरातून नारळाच्या काथ्या संकलित करून त्यांचा पुनर्वापर करण्याचा संदेश दिला.

यावेळी पर्यावरण समितीच्या प्रमुख रूपाली आव्हाड मॅडम यांनी कोकोपीटचे विविध उपयोग विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कोकोपीटचा उपयोग रोपवाटिका, कुंड्यांमधील रोपांची वाढ, बियांची उगवण तसेच मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी करता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या टाकाऊ साहित्याचा योग्य वापर करून पर्यावरणपूरक संसाधन तयार करता येते, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तयार करण्यात आलेल्या कोकोपीटचा उपयोग शाळेतील रोपवाटिका, बीज बँक व वृक्षसंवर्धन उपक्रमासाठी करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजले.

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोकोपीट निर्मितीची प्रक्रिया व त्याचे पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “नारळाची काथी वाया न घालवता, तिचे कोकोपीट बनवूया आणि हिरवाई वाढवूया” असा पर्यावरणपूरक संकल्प केला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!