विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

धुळे : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शिरपूर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून या कारवाईत एकूण 12 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, इंदोरहून पुण्याकडे जाणारे अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक NL 01 AF 1275 हे शिरपूर तालुक्यातील हाडाके चेक पोस्टवर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी अडवले. तपासणी दरम्यान सदर वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, गुटखा व तंबाखूचा साठा आढळून आला.

या कारवाईत 11 लाख 32 हजार 620 रुपये किमतीची 1275 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी मूळचा हरियाणाचा रहिवासी असलेल्या ट्रकचालक नाजीर माजीद याच्याविरुद्ध शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, 17 सप्टेंबर रोजी शिरपूर शिवारातील मांडळ येथील मेसर्स रतलाम इंटरप्रायजेसवर देखील प्रशासनाने शोध मोहीम राबवली. तेथून विश्लेषणासाठी नमुने घेतल्यानंतर 87 हजार रुपये किमतीचा 725 किलो स्टार्च (मक्याचा साठा) जप्त करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने व धुळे जिल्ह्याचे सहआयुक्त माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार यांच्या पथकाने केली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!