जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा : येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील रोटरी भवन येथे झालेल्या अभियंता सन्मान सोहळ्यात श्रीमती शरदचंद्रिका पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांच्या हस्ते रोटरी सदस्य असलेल्या अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. संजय बारी, मानद सचिव लीना पाटील आणि प्रकल्प प्रमुख ध्रुमील अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी बोलताना म्हटले की, “अभियंत्यांचे राष्ट्राच्या निर्मितीत अमूल्य योगदान आहे. विविध शाखांतील अभियंत्यांनी मानवी जीवन सुखी आणि अडचणीमुक्त करण्यासाठी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून त्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत.” यावेळी आशिष गुजराथी यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना त्यांचे खानदेशशी असलेले नातेही सांगितले. अध्यक्ष संजय बारी यांनी मनोगतातून अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले.
रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सदस्य असलेले अभियंते विलास एस. पाटील, प्रकाश बी. पाटील, आशिष गुजराथी, संतोष बाविस्कर, शशिकांत पाटील, मनोज पाटील, ध्रुमील अग्रवाल आणि लीना पाटील यांचा क्लबच्या वतीने त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा तथा भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी यांचा ‘रायझिंग स्टार’ पुरस्कार मिळाल्याबद्दलही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पी. पाटील आणि गौरव महाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन लीना पाटील यांनी केले. सोहळ्याला रोटरी सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
