विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
यावल पश्चिम वनक्षेत्रात कारवाई; वाहनासह ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त
यावल : यावल पश्चिम वनविभागाच्या हरिपुरा-जामण्या राऊंड स्टाफ पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरीत्या जळाऊ लाकडाची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत वाहनासह जळाऊ लाकूड असा एकूण ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पश्चिम वनक्षेत्रातून अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिपुरा व जामण्या येथील राऊंड स्टाफ वड्री धरण ते वड्री रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना एक पिकअप वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. सदर वाहनातून आडजात जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वन कर्मचाऱ्यांना पाहताच वाहनचालकाने वाहन जागेवरच सोडून पलायन केले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये आडजात जळाऊ लाकूड आढळून आले. वाहन क्रमांक एमएच १९ एस ४६९६ असून, वाहन व जळाऊ लाकूड असा एकूण ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल पावतीद्वारे मुद्देमाल मु.वि. केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणी वर्तुळ अधिकारी हरिपुरा पूर्व यांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी प्र.री. क्र. ५/२०२६ जारी केला आहे. पुढील तपास वनपाल हरिपुरा एस.बी. इंडे करीत आहेत.
ही कारवाई सौरिष सहाय, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव; एस.ए. पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, यावल प्रा. व कॅम्पा; तसेच वनक्षेत्रपाल पी.डी. जोशी, यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत डी.ए. परदेशी, वनपाल जामण्या, एस.एस. भोंगरे, वनरक्षक हरिपुरा पूर्व, एस.पी. भालेराव, वनरक्षक हरिपुरा, एस.बी. पाटणे, दीपक चव्हाण, राजेश बारेला, वनरक्षक, तसेच राजू तडवी व शकील तडवी, वनसेवक यांनी सहभाग घेतला.
