पारोळा पोलिसांची धडक कारवाई; प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियमसह ६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

पारोळा : इको वाहनांच्या सायलेन्सरमधील मौल्यवान धातू चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पारोळा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील चोरीच्या तयारीत असताना राष्ट्रीय महामार्गालगत नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या कारमधून फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम या मौल्यवान धातूंसह चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे यासिफ यामीन चौधरी आणि आरिफ सलीम असून, दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. पारोळा पोलिसांचे पथक राष्ट्रीय महामार्गालगत नाकाबंदी करत असताना कारमधून संशयास्पद स्थितीत असलेल्या या दोघांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे इको वाहनांच्या सायलेन्सरमध्ये वापरले जाणारे मौल्यवान धातू तसेच चोरीसाठी आवश्यक साहित्य आढळून आले.

पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या साहित्याची तपासणी केली असता सायलेन्सरमधील मौल्यवान धातू चोरीचे प्रकरण समोर आले. या कारवाईमुळे परिसरातील अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, पीएसआय विजय बोंबे, हेड कॉन्स्टेबल शरद पाटील, महेश पाटील, पोलीस कर्मचारी अभिजीत पाटील, मिथुन पाटील, आकाश पाटील, तुषार सोनवणे तसेच महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथील हेड कॉन्स्टेबल हितेश पाटील, राजेंद्र ठाकूर, अनिल सपकाळ, विजय दुसाने, सुशील पाटील, संदीप पाटील आदींच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे इको वाहनांच्या सायलेन्सरमधील महागड्या धातूंच्या चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!