मिरवणूक मार्ग, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि विसर्जनाच्या नियोजनावर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार
जळगाव : आगामी श्री गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे संपन्न झाली.

दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असून, या काळात गणेश मंडळांच्या मिरवणुका आणि विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे तसेच अतिक्रमणे तातडीने हटविणे, विद्युत तारा व खांबांची सुरक्षितता तपासणे आणि आवश्यक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्रे देणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, तसेच विसर्जन मार्ग सुस्थितीत ठेवण्याबरोबरच विसर्जन मिरवणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली.
मेहरुण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्माल्य संकलनासाठी विशेष पथकाची व्यवस्था करण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यावरही भर देण्यात आला.
गणेशोत्सव हा शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून मिरवणुका शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडाव्यात. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळे यांच्यात समन्वय ठेवून उत्सव निर्विघ्न पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
