शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटीचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगले गणपती बाप्पा साकारण्याचे कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी :

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगावात तब्बल ३५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शाडूमातीपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या मूर्ती साकारण्याचा अनोखा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. शिक्षण प्रसारक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य कार्यशाळेची ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली असून, संस्थेला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

प. न. लुंकड कन्या शाळा व शेठ ला. ना. सा. विद्यालयाच्या मैदानावर सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत ‘पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाने कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे मुख्य प्रशासक डॉ. इंद्रजीत मोरे, ज्येष्ठ संचालक प्रा. शरच्चंद्र छापेकर, सहसचिव मीरा गाडगीळ, ॲड. पंकज अत्रे, समन्वयिका पद्मजा अत्रे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, स्वयंसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

४० मूर्तिकारांकडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन

कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक टेबलजवळ एक याप्रमाणे तब्बल ४० मूर्तिकारांची उपस्थिती होती. या मूर्तिकारांनी विद्यार्थ्यांना शाडूमातीचा योग्य वापर, मूर्तीची रचना, आकारमान व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

संस्थेतील तसेच इतर शाळांमधील सुमारे ३५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत विविध आकार व प्रकारच्या आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेले गणराय पाहताना मैदानावर भक्ती आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

आयोजकांकडून सहभागी विद्यार्थ्यांना टेबल क्रमांक, ग्रुप क्रमांक, शाडूमाती, नाश्ता व पाण्याची बाटली उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि रोटरी स्वयंसेवक आपापल्या ड्रेसकोडमध्ये सहभागी झाले होते. गणेशमूर्ती साकारल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आले.

‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून संस्थेचा गौरव

उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे मुख्य प्रशासक डॉ. इंद्रजीत मोरे यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, अभिजीत पाटील व पदाधिकाऱ्यांना रेकॉर्डचे प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करून संस्थेचा गौरव करण्यात आला.

या उपक्रमासाठी शेठ ला. ना. विद्यालय व प. न. लुंकड कन्या शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच रोटरी स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिल्याने हा उपक्रम जळगावच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष ठरला. ‘मूर्तीही पर्यावरणपूरक आणि उत्सवही पर्यावरणपूरक’ असा प्रभावी संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!