१८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी; दारूबंदी कायद्यान्वये १९ कारवाया, तब्बल ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.
जामनेर, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी जामनेर तालुक्यात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या मोहिमेत १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच दारूबंदी कायद्यान्वये १९ कारवाया करत तब्बल ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजता सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेचा उद्देश आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे तसेच अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळवणे हा होता.

🔎 १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी
जामनेर, पहूर व फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून एकूण १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. यामध्ये जामनेर पोलीस ठाणे हद्दीतील ७२, पहूर येथील ६४ आणि फत्तेपूर येथील ५३ आरोपींचा समावेश आहे.
या कारवाईदरम्यान २ पाहिजे आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर २ आरोपींना हद्दपार नोटीस बजावण्यात आली. तसेच न्यायालयीन कारवाईसाठी प्रलंबित असलेल्या ५ आरोपींविरुद्ध NBW (नॉन-बेलेबल वॉरंट) बजावण्यात आले.
🍺 दारूबंदी कायद्याची १९ प्रकरणे
विशेष मोहिमेत दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी धडक कारवाई केली. जामनेर येथे ६, पहूर येथे १० आणि फत्तेपूर येथे ३, अशा एकूण १९ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय संशयित वाहनांचीही तपासणी करण्यात आली. कारवाईत ५२ मोटारसायकली व १ रिक्षा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

🚔 सण-उत्सव काळात पोलिसांचा ‘अलर्ट मोड’
सण-उत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी अशा प्रकारच्या विशेष प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या विशेष मोहिमेसाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पायऱ्ये विभाग, तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर, पहूर व फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या पथकांनी सहभाग घेतला.

सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यात पोलिसांनी पहाटेपासूनच धडक मोहीम राबवत गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे—कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
