जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
रावेर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे विद्यार्थ्यांच्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल पाच थरांची मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा रोमांचक अनुभव घेतला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. उज्ज्वल अग्रवाल होते. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. संतोष शेठ अग्रवाल, संस्थाचालक श्री. विकास देशमुख, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. एन. जे. पाटील, पर्यवेक्षक श्री. वाय. जी. कट्यारमल, श्री. जी. टी. पाटील, प्राथमिक विभागाचे व्यवस्थापक श्री. डी. डी. पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडीचा थर रचत कार्यक्रमात रंगत आणली. **‘गोविंदा आला रे आला’**च्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला शिक्षक व उपस्थितांनीही उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सरदार जी. जी. हायस्कूल व कमळाबाई प्राथमिक विद्यामंदिरातील चिमुकल्या बालगोपालांची राधा-कृष्ण वेशभूषा. राधा-कृष्णाच्या सुंदर वेशभूषेत सजलेल्या बालगोपालांनी उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
या संपूर्ण दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, साहस, एकजूट आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दोघं विभागातील दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला संस्थाचालक श्री संतोषशेठ अग्रवाल यांच्यातर्फे रोख बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
