महावितरणच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेतकऱ्यांनी सातत्याने सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे संतप्त होत मध्यरात्री रास्ता रोको आंदोलन केले. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीच्या कामांवर मोठा परिणाम होत असून, शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनाची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड तसेच महावितरणचे अधिकारी निलेश सराफ घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.
मात्र, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भवरखेडा येथील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे महावितरणकडून आता या समस्येवर तातडीने काय उपाययोजना केली जाते का ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
