कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडणार; रात्रीच्या सहा तासांच्या पुरवठ्यातही तीन तासांचा खंड
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील गरताड व धनवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या अनियमित वीजपुरवठ्याविरोधात महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषिपंपांसाठी रात्रीचा आठ तासांचा वीजपुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ सुमारे सहा तास वीज मिळत आहे. त्यातही ‘झिरो लोड सेटिंग’च्या नावाखाली तीन-तीन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या वीजपुरवठ्याची वेळ रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ अशी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दिवसभर शेतातील कामे आणि रात्री पिकांना पाणी देण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र रात्रीच्या वेळीही वीजपुरवठ्यात वारंवार खंड पडत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण झाले असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या समस्येबाबत चोपडा येथील अभियंता महाजन साहेब व दीपक पाटील साहेब यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपली मागणी मांडली आहे. कृषिपंपांना नियमित, पुरेसा आणि शक्यतो विनाखंड वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘झिरो लोड’च्या नावाखाली अनियोजित वीजकपात थांबवा, शेतीसाठी निश्चित वेळेत पुरेसा वीजपुरवठा द्या आणि शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येईल अशी व्यवस्था करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खानदेशातील विविध भागांत कृषिपंपांच्या अनियमित वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. दिवसा वीज उपलब्ध नसणे आणि रात्रीच्या पुरवठ्यातही खंड पडणे, यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. गरताड-धनवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी आता या प्रश्नावर थेट आंदोलनाचा इशारा दिल्याने महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
“वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवा; अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा गरताड-धनवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
