अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गोविंदा’च्या जयघोषाने अंतुर्ली परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

दहीहंडी मिरवणुकीला बेलदार वाड्यातून सुरुवात झाली. अमळनेर येथील मोरया बँडच्या तालावर निघालेली मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत बसस्थानक परिसरात पोहोचली. यावेळी तरुणाईसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच दहीहंडीच्या गाण्यांनी वातावरणात उत्साह निर्माण केला.

बसस्थानक परिसरात भगवान श्रीकृष्ण यांची आरती करण्यात आली. यावेळी रथामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा फोटो तसेच श्रीकृष्ण-राधा यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. मूर्तींची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.

आरतीनंतर गोविंदा पथकाने चार थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील बसस्थानक परिसरात हा सोहळा पार पडला. दहीहंडी फुटताच उपस्थितांनी जल्लोष करत श्रीकृष्णाचा जयघोष केला.

उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दहीहंडी उत्सवासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग, अबालवृद्ध तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

एकूणच, भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम घडवत अंतुर्लीतील दहीहंडी उत्सव जल्लोषात संपन्न झाला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!