६.५ कि.मी. रस्त्यासाठी १४.५९ कोटींचा निधी; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

यावल : बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यासोबतच या महत्त्वपूर्ण कामास प्रत्यक्ष सुरवात झाली असून, शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.

यावल शहरातील कि.मी. १७४.१०० ते १८०.६०० या दरम्यानच्या एकूण ६.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १४ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहे.

महामार्गामुळे शहरांतर्गत वाहतुकीवर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची दैनंदिन ये-जा, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळण सुरळीत राहावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर यावल शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होईल. नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच शहरातील दळणवळण व्यवस्था बळकट होऊन स्थानिक व्यापार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

यावल शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हे काँक्रीटीकरणाचे काम महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात असून, नागरिकांकडूनही या कामाचे स्वागत होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!