धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे.
जवाहर नूतन विद्यालय, वारुड येथे शिक्षक दिनानिमित्त अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव
वारुड : जवाहर नूतन विद्यालय, वारुड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. महाले सर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका उत्साहाने व जबाबदारीने पार पाडल्या. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या दैनंदिन कामकाजाचा आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

विशेष म्हणजे इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. अनुष्का नागमल हिने एक दिवसासाठी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारत शाळेचे कामकाज पाहिले. विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारताना शिक्षकांचे कर्तव्य, शिस्त, नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी जवळून अनुभवली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, आत्मविश्वास, शिस्त आणि शिक्षकांविषयी आदराची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम केवळ मनोरंजनात्मक न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची अनोखी संधी ठरला.

शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

