विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

पुणे : बहिणीशी बोलत नसल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर परिसरात घडली आहे. एवढ्यावरच न थांबता, हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःच्या १७ वर्षीय मुलाचाही गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजगुरुनगर येथील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन इमारतीत रविवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान ही थरारक घटना घडली. महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५, मूळ रा. कनेरसर, ता. खेड) याचे पत्नी दिपा दौंडकर (वय ४०) यांच्याशी वाद झाला होता.

‘तू माझ्या बहिणीशी का बोलत नाहीस?’ या कारणावरून आरोपी पत्नीवर संतापला होता. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि आरोपीने बेडरूममध्ये पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

आईला पाहण्यासाठी गेलेल्या मुलासमोर उघड झाला भयंकर प्रकार

आईकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व बेडरूममध्ये गेला. तेव्हा त्याच्या समोर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. आपला गुन्हा उघडकीस येईल या भीतीने आरोपीने स्वतःच्या मुलावरही हल्ला केल्याचे समोर आले आहे.

आरोपीने ओढणीच्या साहाय्याने मुलाचा गळा आवळून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने जीवाच्या भीतीने आरडाओरड करत घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्याला चाकूने ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात अथर्वच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पत्नीच्या हत्येनंतर स्वतःच्या अल्पवयीन मुलावरही जीवघेणा हल्ला केल्याच्या या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!