विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सोमवारी एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. सहस्रकुंड धबधबा परिसरात महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा तोटंबा घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी गावातील काही भाविक सहस्रकुंड धबधबा येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण कमांडर जीपमधून तेलंगणाच्या दिशेने परतत होते. यावेळी किनवट तालुक्यातील तोटंबा घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली.
धडक इतकी जबरदस्त होती की, जीपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कुबीर येथे हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त कमांडर जीप ही सहस्रकुंड ते तेलंगणा या मार्गावर प्रवासी वाहतूक करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
