विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित

नाशिक : राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर येथील वरिष्ठ सहायक रामचंद्र नरसू माकरे यांना लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांच्या न्यायालयाने माकरे यांना सहा महिन्यांच्या कारावासाची तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी माकरे यांनी सुरुवातीला तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर तडजोड होऊन दोन हजार रुपये स्वीकारण्यात आले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागल्यानंतर वरिष्ठ सहायक रामचंद्र माकरे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली.

नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी आणि कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे यांनी प्रकरणातील कामकाज पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता शिरीष कडवे आणि सचिन गोरवाडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने एखादी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!