जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव : जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानक, जळगाव येथून चाळीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधून सोन्याची मणी मंगळसूत्र व सोन्याचे टॉप्स असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत दिवेरे यांनी गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अनिल बाय यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना देऊन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच विविध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. अखेर चंदन उर्फ चंदन सरसोने, वय ४८ वर्षे, रा. नारायणवाडी, इंदिरानगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या हरिविठ्ठल नगर, जळगाव आणि अनिता विजय सरसोने, वय ३५ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, वाघ नगर, जळगाव या दोन महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन्ही महिला आरोपी सराईत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स आणि ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज आहे.

दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही अमळनेर व जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीसंबंधी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघींच्या इतर गुन्हेगारी कारवायांचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत दिवेरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी श्री. अनिल बाय यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा छडा लावला.

जळगाव पोलिसांच्या या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर पोलिसांचा वचक निर्माण झाला असून, नागरिकांमध्येही पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!