जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार
जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचा ठोस संदेश देण्यात आला.

या रूट मार्चचे नेतृत्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट करण्यात आले. विविध भागांतून मार्गक्रमण करत पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास निर्माण केला.

ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण शांतता, बंधुभाव व सामाजिक सलोखा राखत उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असा संदेशही या रूट मार्चमधून देण्यात आला. सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले.
