जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धतीबाबत आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व जाणून घेतले.

यावेळी करिष्मा चव्हाण-परदेशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व समजावून सांगितले. साबणाने हात धुण्याची योग्य पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दाखवून देण्यात आली. तळहात, हाताची पाठ, बोटांमधील भाग, अंगठे, नखांच्या आजूबाजूचा भाग तसेच मनगट स्वच्छ करण्याची पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. हात किमान २० सेकंद साबणाने चोळून स्वच्छ पाण्याने धुण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.
जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर तसेच खोकताना किंवा शिंकताना स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. स्वच्छ हातांमुळे विविध आजारांपासून बचाव करण्यास मदत होते, त्यामुळे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमासाठी पर्यवेक्षक निलेश पवार व उपशिक्षिका अनिता सोनवणे उपस्थित होते. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून हात धुण्याची योग्य पद्धत आत्मसात केली.
बालवयापासूनच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांच्या अंगी रुजाव्यात आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
