जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.
जळगाव शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलींचा तपास करत शनीपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून बजाज कंपनीच्या दोन पल्सर व होंडा कंपनीची एक युनिकॉर्न अशा एकूण तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील बालाजी पेठ येथून अज्ञात चोरट्याने बजाज पल्सर मोटारसायकल चोरून नेली होती. सदर मोटारसायकल दि. १८ ऑगस्ट रोजीही मिळून न आल्याने तिच्या मालकाने शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वरिष्ठांच्या आदेशानुसार डीबी पथकाने बालाजी पेठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शेख इरफान शेख रईस याला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत संशयिताने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या बजाज कंपनीच्या दोन पल्सर आणि होंडा कंपनीच्या एका युनिकॉर्न मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयसवाल तसेच पोलीस पथकाने केली.
