जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शांतता समिती व मिरवणूक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

जळगाव पोलिस मुख्यालयात झालेल्या बैठकीस शांतता समितीचे सदस्य, मिरवणूक पदाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, ध्वनिक्षेपकांचा वापर, सोशल मीडिया पोस्ट, मार्गातील अडथळे आणि संवेदनशील बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पोलिसांनी मिरवणुकीतील सहभागी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा, गाणी अथवा वक्तव्ये करू नयेत, धार्मिक भावना दुखावणारे पोस्टर, फोटो, व्हिडिओ किंवा संदेश प्रसारित करू नयेत, तसेच परवानगीशिवाय ड्रोन अथवा इतर उपकरणांचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या.

४ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

ईदच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, SDPO, प्रोबेशनरी DySP, पोलिस निरीक्षक, API/PSI, पोलिस अंमलदार, RCP, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड, वाहतूक शाखा, SRPF कमांडो, BDDS पथक, डॉग युनिट, क्विक रिस्पॉन्स टीम आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग पथक अशा विविध यंत्रणांचा बंदोबस्तात समावेश आहे.

मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिस्थितीनुसार वाहतूक मार्गात बदल अथवा डायव्हर्शन करण्याची तयारीही करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सातत्याने मॉनिटरिंग करून अफवा किंवा आक्षेपार्ह मजकूर पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

संवेदनशील भागांवर विशेष नजर

मिरवणुकीदरम्यान शांतता भंग होऊ नये यासाठी संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाई तसेच आवश्यक त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून देखरेख करण्याची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे.

“ईद हा शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविणारा सण आहे. सर्वांनी एकत्रितपणे हा सण साजरा करावा. मिरवणुकीतील आयोजक, पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच नागरिकांनी प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

शांतता, उत्साह आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत ईद-ए-मिलाद साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!