जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : आनंददायी शनिवारच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विज्ञान क्लब समितीच्या वतीने ‘रुबिक्स क्यूब’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खेळता-खेळता विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, एकाग्रता, निरीक्षणशक्ती, संयम आणि समस्या-निराकरण कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
उपक्रमाच्या प्रारंभी विज्ञान क्लब समिती प्रमुख साधना शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना रुबिक्स क्यूबची रचना, विविध रंगांची ओळख आणि क्यूब हाताळण्याच्या मूलभूत पद्धतीची माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना क्यूब फिरविण्याचे तंत्र समजावून सांगण्यात आले.


विद्यार्थ्यांनी स्वतः रुबिक्स क्यूब हाताळत एका रंगाची बाजू पूर्ण करणे, एक थर तयार करणे तसेच क्यूब सोडविण्याचे आव्हान स्वीकारले. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या; मात्र त्यांनी संयमाने पुन्हा-पुन्हा प्रयत्न करत समस्या सोडविण्याचा आनंद अनुभवला. क्यूब सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याने एकमेकांकडून शिकण्याची व सहकार्याची भावनाही विकसित झाली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ रुबिक्स क्यूब सोडविण्याचे कौशल्यच नव्हे, तर नियोजन, तर्कशुद्ध विचार, निर्णयक्षमता, चिकाटी आणि समस्या-निराकरण यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आनंददायी शनिवारचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि उत्साहपूर्ण ठरला.


मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले, “खेळातून शिकणे आणि शिकताना विचार करणे, हा आनंददायी शनिवारचा खरा उद्देश आहे. रुबिक्स क्यूबमुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, एकाग्रता, संयम व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते. अशा कृतीआधारित उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिकण्याची उत्सुकता वाढते.”

उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन विज्ञान क्लब समिती प्रमुख साधना शिरसाट यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून ‘खेळता-खेळता शिकण्याचा’ आनंद अनुभवला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!