जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव : शहरातील कालिंका माता चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सलग होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हालचालींना वेग आला आहे. कालिंका माता चौकात अंडरपास की उड्डाणपूल, याबाबत तांत्रिक अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश खासदार स्मिता वाघ यांनी दिले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन योग्य पर्यायाची निवड केली जाणार आहे.

तरसोद-पाळधी बायपासच्या दुरुस्तीमुळे शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर सध्या वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. कालिंका माता चौक ते खोटेनगरदरम्यान महामार्गाची दुरवस्था, विविध ठिकाणी सुरू असलेली कामे आणि बायपासवरील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कालिंका माता चौक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोका वाढला आहे.
२१ दिवसांत चार जणांचा मृत्यू
बायपासवरील वाहतूक बंद झाल्यानंतर शहरातील महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. गेल्या २१ दिवसांत विविध अपघातांत चार जणांचा मृत्यू झाल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
१ ऑगस्ट रोजी कालिंका माता चौकाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ५ ऑगस्ट रोजी अजिंठा चौफुली ते इच्छादेवी चौकादरम्यान भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने मंगला अर्जुन माळी यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा भरत माळी जखमी झाला. २० ऑगस्ट रोजी बांभोरी पुलाजवळ झालेल्या अपघातात योगेश उर्फ युवराज कडू महाजन यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री झालेल्या आणखी एका अपघातात श्रद्धा कॉलनीतील अनिरुद्ध डहाळे यांचा मृत्यू झाला.
सलग अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाणे आणि संभाव्य ब्लॅक स्पॉट्सचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अंडरपास की उड्डाणपूल; तांत्रिक अभ्यासानंतर निर्णय
कालिंका माता चौकातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी अंडरपास अथवा उड्डाणपूल यापैकी कोणता पर्याय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरेल, याचा तांत्रिक अभ्यास करून डीपीआर तयार केला जाणार आहे. चौकाची भौगोलिक परिस्थिती, सध्याचा वाहतूक भार, भविष्यातील वाहनांची वाढ आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले असून कामावर देखरेख ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
बायपास पुन्हा बंद; शहरातील महामार्गावर ताण
दुरुस्तीनंतर १५ ऑगस्टपासून बायपासवर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच ती पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील जुन्या महामार्गावर वाहतुकीचा ताण आणखी वाढला आहे.
बायपासचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक पूर्ववत करण्यासोबतच कालिंका माता चौकासाठी सुरक्षित आणि कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. आता डीपीआर कधी तयार होतो, अंडरपास की उड्डाणपूल यापैकी कोणता पर्याय निवडला जातो आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
