जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील.
ईद, दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, पोलीस दूरक्षेत्र, वाहतूक शाखा तसेच महामार्ग सुरक्षा पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत कारवाई विशेष मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. वाहतूक नियमांचे पालन करणे, हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे, असा संदेशही पोलिसांनी नागरिकांना दिला.

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
विशेष मोहिमेत एकूण ५६७० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, त्यातून ३९ लाख ७० हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये हेल्मेटशिवाय वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, बेकायदेशीर पार्किंग, सिग्नल उल्लंघन, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राइव्ह, अल्पवयीन चालक, मोबाईलचा वापर, राँग साइड ड्रायव्हिंग तसेच वाहन कायद्यांतर्गत विविध उल्लंघनांचा समावेश आहे.

याशिवाय महामार्ग सुरक्षा पथकाने (HSP) १४३५ प्रकरणांमध्ये कारवाई करून १२ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

अशा प्रकारे जळगाव जिल्हा पोलीस दल आणि महामार्ग सुरक्षा पथकाची मिळून एकूण ७१०५ प्रकरणांमध्ये कारवाई झाली असून, एकूण ५२ लाख ४५ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन
सणांचा आनंद घेताना नागरिकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये तसेच रस्त्यावर बेफिकीरपणे वाहन चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

आगामी सण-उत्सवांच्या काळातही वाहतूक शिस्त आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
