जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगाव : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह ५ चतुर्थ क्रमांक मिळवत एकूण १४ यशांची नोंद केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशिक्षणार्थींनी आज भेट घेऊन आनंद व्यक्त केला. यावेळी सर्व गुणवंत खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अवघ्या एका महिन्याच्या प्रशिक्षणात मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद असून, प्रशिक्षणार्थींची जिद्द, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास याचे हे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पारंपरिक मर्दानी खेळकलेचे जतन व संवर्धन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करणारे श्रीराम गुरुकुलचे क्रीडा प्रमुख प्रशिक्षक श्री. धीरज जावळे, मार्गदर्शक श्री. विशाल निकम, राजपूत सर तसेच संपूर्ण प्रशिक्षक टीमचेही अभिनंदन करण्यात आले.

जळगावच्या या युवा खेळाडूंनी भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासह देशाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
