जळगाव जिल्हा प्रतिनिधी : शाकीर शेख

चाळीसगाव : जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे डेंग्यू, इतर कीटकजन्य व जलजन्य आजार, साथीचे आजार तसेच एचआयव्ही/एड्स आणि कुष्ठरोगाबाबत जनजागृतीपर आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक हिवताप, नाशिक डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार, तसेच चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. बांगर आणि हिवताप पर्यवेक्षक श्री. किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील समुपदेशक नामदेव अहिरे, LSO सचिन महाले, आरोग्य सेवक दीपक ठाकरे, आरोग्य सेवक चेतन गुढेकर यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरात डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग आणि हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जलजन्य व साथीच्या आजारांपासून बचावासाठी स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि आरोग्यविषयक खबरदारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

याशिवाय एचआयव्ही/एड्स आणि कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. आजाराची लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली. आरोग्यविषयक सजगता वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपायांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!