रावेर : रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर बस स्टँडच्या मागील परिसरातील छोट्या मार्केटजवळ एक इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.
पोलिसांनी संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी धातूचा गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) आणि ९ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत संशयिताचे नाव कृष्ण दत्तू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे समोर आले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गावठी कट्टा व काडतुसे त्याच्याकडे कुठून आली, तसेच ती कोणाकडून व कोणत्या कारणासाठी खरेदी केली, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि पोलीस उपअधीक्षक अनिल वडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रावेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त झाल्याने परिसरातील अवैध शस्त्रवापरावर पोलिसांनी मोठा प्रहार केला असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना चांगलाच धक्का बसला आहे.
