प्रमोद बोरसे विशेष वृत्तांत, अमळनेर तालुका प्रतिनिधी :

पिंपरी, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे आदिवासी समाजातील महिलांची बैठक घेऊन महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या बैठकीचे आयोजन अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेच्या महिला आघाडीच्या अमळनेर तालुकाध्यक्ष भारतीताई सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

यावेळी आदिवासी समाजातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावा आणि शासनाच्या विविध योजना, कर्ज सुविधा तसेच महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. पिंपरी गावातील महिलांनी पुढाकार घेत बचत गटाची स्थापना केली असून, लवकरच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हा उपक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक तथा अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेशभाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील आदिवासी महिलांनीही बचत गट स्थापन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुकेशभाऊ साळुंखे यांनी केले आहे. आपल्या तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून महिला बचत गटाची स्थापना करावी व त्यामाध्यमातून उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम ठरत असून, या उपक्रमामुळे आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!