शहापूर : प्रतिनिधी

कल्याण येथून चोरीला गेलेल्या वाहनाचा वासिंद-खर्डी परिसरात थरारक पाठलाग करत अखेर शोध घेण्यात यश आले. नागरिकांची सतर्कता, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली तात्काळ माहितीची देवाणघेवाण आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीला गेलेली कार हस्तगत करण्यात आली असून, वाहन घेऊन जाणाऱ्या संशयित व्यक्तीलाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कल्याण येथून वाहन चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध सुरू असतानाच संबंधित वाहनावर सायंकाळी ६:०१ वाजता वासिंद परिसरात दंड झाल्याचा मेसेज वाहनमालकांना प्राप्त झाला. या मेसेजमधून वाहनाचे लोकेशन, संबंधित अधिकारी आणि पोलीस ठाण्याची महत्त्वाची माहिती मिळाली.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहापूर शहराध्यक्ष रोहन गगे यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर वाहनाचे फोटो व माहिती वासिंद पोलीस ठाण्याच्या ट्रॅफिक विभागातील ASI विजय वाळुंज यांच्याकडे पाठवण्यात आली.

विजय वाळुंज यांनी तात्काळ तपास करून सदर वाहनाला मुंबई-नाशिक महामार्गावरील खातिवली येथील फूड मॅक्स हॉटेलजवळ ओव्हरसीटिंगप्रकरणी सायंकाळी ६:०१ वाजता दंड झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वाहन शहापूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली.

ही माहिती तात्काळ सोशल मीडिया ग्रुपवर प्रसारित करण्यात आली. त्यानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी शहापूर-खर्डी परिसरात वाहनाचा शोध सुरू केला.

दरम्यान, खर्डी येथील प्रशांत सापळे यांना वाहन दिसून आले. वाहनचालकाने खर्डी येथील फाऊंटन हॉटेलजवळ कार उभी करून वॉशरूममध्ये गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ हॉटेल मालक व स्थानिक मित्रांना माहिती दिली आणि वाहनाची चावी ताब्यात घेतली.

याचवेळी रोहन गगे यांनी मनसेचे खर्डी तालुका उपाध्यक्ष किरण सांडे, खर्डी शहराध्यक्ष मंगेश कुकडे आणि सहकारी कुणाल धापटे यांनाही घटनेची माहिती दिली होती. ते देखील वाहनाच्या शोधात असताना घटनास्थळी पोहोचले. संशयित वाहन सोडून महामार्गाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सर्वांनी मिळून त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि खर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर चोरीचा गुन्हा महात्मा फुले पोलीस ठाणे, कल्याण येथे नोंद असल्याची माहिती आहे.

या संपूर्ण कारवाईत वेळेवर मिळालेली माहिती, पोलिसांचे सहकार्य आणि नागरिकांची सतर्कता यामुळे चोरीला गेलेले वाहन तसेच संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात यश आले.

कारवाईत तत्परता दाखवल्याबद्दल शहापूर पोलीस स्टेशनचे PI विलास कदम, ASI विजय वाळुंज तसेच खर्डी पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून आभार मानण्यात आले.

तसेच रोहन गगे, प्रशांत सापळे, सोमनाथ शिंदे, हॉटेल मालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे विशेष कौतुक करण्यात आले.

नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांचे सहकार्य यांचा योग्य समन्वय साधला तर गुन्हेगारीला आळा घालण्यास मोठी मदत होऊ शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!