जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी जीवनकौशल्ये आत्मसात व्हावीत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य ती प्राथमिक मदत करता यावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात डॉ. जयश्री ललित महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे महत्त्व समजावून सांगत प्रथमोपचार पेटीची प्रत्यक्ष ओळख करून दिली. प्रथमोपचार पेटीमध्ये असणाऱ्या विविध साहित्याचा उपयोग कोणत्या प्रसंगी व कशाप्रकारे केला जातो, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

अपघात किंवा खेळताना विद्यार्थी जखमी होणे, किरकोळ दुखापत होणे, रक्तस्राव होणे, भाजणे, चक्कर येणे आदी प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, जखमी व्यक्तीला सुरक्षित ठेवणे आणि तातडीने योग्य व्यक्तीची किंवा वैद्यकीय मदत घेणे याबाबत डॉ. महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच आपत्कालीन प्रसंगी चुकीची कृती केल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, त्यामुळे प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच प्रथमोपचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. “अपघात झाल्यास सर्वप्रथम काय कराल?”, “प्रथमोपचार पेटीचा उपयोग कशासाठी होतो?”, “जखमी व्यक्तीला मदत करताना कोणती काळजी घ्यावी?” अशा प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून प्रथमोपचाराबाबतची माहिती जाणून घेतली.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, “प्रथमोपचाराचे ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्याला असणे आवश्यक आहे. संकटाच्या वेळी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य मदत करण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी शाळेत अशा कृतीआधारित उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाते.”

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रसंगावधान, आत्मविश्वास, आरोग्यविषयक जागरूकता, सुरक्षिततेची भावना आणि इतरांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे ज्ञान आणि कौशल्य मिळाल्याने हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी हेल्थ अँड वेलनेस समितीच्या अध्यक्षा उज्वला नन्नवरे यांनी डॉ. जयश्री ललित महाजन यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे महत्त्व, प्रथमोपचार पेटीचा उपयोग आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेल्थ अँड वेलनेस समितीच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेत विशेष प्रयत्न केले. शाळेच्या आरोग्य व सुरक्षितता उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, कृतीआधारित आणि जीवनोपयोगी ठरला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!