विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे १० वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने चिमुरडीला गावाबाहेर नेले. त्यानंतर उसाच्या शेताजवळ तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. बराच वेळ मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेतल्यानंतरही मुलगी आढळून न आल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनेच्या निषेधार्थ पुणे–नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आल्याची माहिती आहे.

निरागस बालिकेवरील या अमानुष कृत्यामुळे परिसर हादरला असून, आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!