नेरी-एरंडोल रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप

विभागीय प्रतिनिधी | जामनेर, महेशप्रसाद दिक्षित.

नेरी परिसरात वाढलेल्या अवैध गावठी व देशी दारू विक्रीला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत महिलांनी मंगळवारी रात्री आक्रमक पवित्रा घेतला. दारूविक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांमध्ये वाद-विवाद आणि महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त महिलांनी नेरी-एरंडोल मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.

महिलांच्या या अचानक आंदोलनामुळे नेरी-एरंडोल महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.

परिसरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यावर कारवाई होत नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी होती. याचदरम्यान दारूच्या नशेत एक तरुण अचानक रस्त्यावर कोसळल्याने संतप्त महिलांच्या आंदोलनाला आणखी धार आली. महिलांनी थेट रस्त्यावर उतरून अवैध दारू विक्री विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

नेरी-एरंडोल मार्गावरून धुळे व नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबल्याने परिस्थिती गंभीर बनली. घटनेची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल शिंदे तसेच पाचोरा विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी कुभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलांशी चर्चा करून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला.

अवैध दारूविक्रीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली. प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संतप्त महिलांनी दिला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!