जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील
पारोळा : तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवरे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना जुन्या बिलांच्या कारणावरून ग्रामसेवक प्रल्हाद पाटील आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेल्या या प्रकाराचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाल्याचे समोर आले आहे.
वादाचे रूपांतर मारहाणीत
जुन्या बिलांवरून सुरू झालेला वाद वाढत गेल्यानंतर संबंधित ग्रामस्थांनी पाटील यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केल्याचा तसेच त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घाबरलेल्या ग्रामसेवक पाटील यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धावपळीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ दाखल केला असून, मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पारोळा पोलीस करीत असून, ग्रामसभेसारख्या लोकशाही प्रक्रियेत शासकीय कर्मचाऱ्याशी झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
