जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार.
नशिराबाद : संत हराळे समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर सभागृहात रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सभेत विविध सहा विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने चर्मकार समाजातील ३० उद्योजकांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. राजेश वाडेकर होते. समाजातील उद्योजकांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी रोहिदास कळसकर (आई कलेक्शनचे संचालक), कल्पेश वाडेकर (हेक्झानेट प्रा. लि., पुणेचे संचालक), मनीषा डोळे (मधुसूदन मेडीकोच्या संचालक) आणि दिपाली सुरवाडे (देनाली फुड्सच्या संचालक) यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.

अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
माजी शिक्षण विस्तार अधिकारी स्व. चंद्रकांत भारुळे साहेब अनाथ बालक दत्तक योजनेअंतर्गत दोन पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पूर्वी पाटील व भावेश पोतदार या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, रजिस्टर, नोटबुक, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, कंपासपेटी आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रजनी सुरवाडे, वैशाली तायडे, इंद्रायणी भारुळे, अशोक सुरवाडे व वैशाली भारुळे यांच्या शुभहस्ते हे साहित्य देण्यात आले.

इंद्रायणी भारुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अनाथ बालकांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.

‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे घडवा’
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेठ ला.ना.सा. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय वानखेडे सर यांनी हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी नोकरी देणारी भावी पिढी घडविण्यासाठी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संजय वानखेडे यांनी संस्थेस १,१११ रुपये, तर डॉ. युवराज सुरवाडे यांनी ५,००१ रुपये सामाजिक देणगी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. राजेश वाडेकर यांनी संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी प्रेमराज काकडे यांची संचालकपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेवानिवृत्त शिक्षक तथा संस्थेचे सचिव लिलाधर जी. भारुळे यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव भारुळे, गोपाळ भारुळे, प्रेमराज काकडे, मयूर भारुळे तसेच सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले.

कार्यक्रमास समाजातील बहुसंख्य बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली. स्नेहभोजनाने या सामाजिक उपक्रमाची सांगता करण्यात आली.

