देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या जलतरण तलावाचे लोकार्पण; विकासकामांना गती देण्याचे आश्वासन
राहुरी प्रतिनिधी, शरद खांदे.
देवळाली प्रवरा | प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षांपासून पक्षाच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करणारे सत्यजित कदम यांचा त्याग वाया जाऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी दिली. देवळाली प्रवरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनीत उभारण्यात आलेल्या जलतरण तलाव तसेच आधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनचे लोकार्पण डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम होते.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी सत्यजित कदम यांच्या कार्याचे कौतुक केले. सत्यजित कदम आणि आपला स्वभाव आक्रमक असला तरी राजकारणात ते गरजेचे आहे. सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कामातून उत्तर देणारी माणसे आपण आहोत, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात केवळ अहिल्यानगर महानगरपालिकेचा स्वतःचा जलतरण तलाव आहे. त्यानंतर ‘क’ वर्ग नगरपरिषद असलेल्या देवळाली प्रवरा येथे जलतरण तलाव उभारणे ही कौतुकास्पद बाब असल्याचेही डॉ. विखे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे यांच्यासह नगरसेवक प्रकाश संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, सौरभ मुसमाडे, बाळासाहेब लोखंडे, दास पठारे, शरद वाळुंज, सचिन शेटे, ऋषभ लोंढा, सुजाता कदम, सिंधुताई वाळुंज, आशाताई चव्हाण, मनीषा कदम, सुवर्णा कोठुळे, सीमा देठे, जयश्री खांदे, चंदाराणी गाडे, पुष्पा तांबे, ठेकेदार ऋषिकेश कदम, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केले, तर आभार अमोल कदम यांनी मानले.
देवळाली प्रवरा शहराच्या विकासाला गती देताना नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून, जलतरण तलाव व सक्शन कम जेटिंग मशीनमुळे शहराच्या सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे.
