अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती नालकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेचे अध्यक्ष श्री. अशोक जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे, संगीतमय कवायत आणि लेझीम नृत्याचे उत्स्फूर्त सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच मागील वर्षी झालेल्या लक्षवेध स्कॉलरशिप परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या विकासासाठी दातृत्वाचा हात

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेच्या रंगकामासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती नालकर यांनी ५ हजार रुपये, तर श्री. अशोक जोशी यांनी १ हजार रुपये देणगी दिली. डॉ. प्रशांत नालकर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शैक्षणिक साहित्याकरिता ९०० रुपये बक्षीस म्हणून दिले.

श्री. सचिन साळवे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. श्रीमती स्वाती थोरात यांच्या पती श्री. गणेश कुर्हे सर यांनी शाळेला ११ चटया व एक व्हाईट बोर्ड भेट दिला.

याशिवाय श्री. दीपक नरोडे, श्री. राजेंद्र गिते, श्री. भारत साळवे, श्री. आप्पा नालकर, ग्रामपंचायत तसेच इतर विद्यार्थीप्रिय नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच शाळेच्या भौतिक सुविधांसाठी ग्रामस्थ व दात्यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानण्यात आले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!