जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ लाना. सार्वजनिक विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, सहसचिवा मीराताई गाडगीळ, संचालक प्रा.शरच्चंद्र छापेकर, पारसमल कांकरिया, ॲड.पंकजदादा अत्रे, रजनी पाठक, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, सु. ग. देवकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे, सु. वा. अत्रे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र वानखेडे, शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका रमा तारे तसेच पर्यवेक्षक जगदीश साळुंके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या गायनाने झाली. ध्वजारोहण व राष्ट्र गीताच्या गायनानंतर “स्वातंत्र्यदिनाचा विजय असो!”, “वंदे मातरम्“भारत माता की जय!” आणि “भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण विद्यालय परिसर दुमदुमून गेला.

शासनाच्या आदेशानुसार शाळांमध्ये संगीतमय कवायत घेण्यात येत असल्याने विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री.उल्हास ठाकरे व सहकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संगीतमय कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील दादा अत्रे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करून देशाप्रती अभिमान बाळगावा, राष्ट्रहिताला सदैव प्राधान्य द्यावे आणि जबाबदार व चांगला नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश देऊन स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सौ.सु.ग.देवकर शाळा, सौ.सु.वा.अत्रे विद्यालय, व शेठ ला.ना. सा.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले त्यांना मार्गदर्शन संगीत शिक्षिका संपदा तुंबडे व श्री.उल्हास ठाकरे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत घुगे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!