काम तातडीने सुरू करा, अन्यथा तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन!
रावेर प्रतिनिधी, वसीम शेख.
रावेर तालुक्यातील पुनखेडा ते पाटोंडी रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुक्ताईनगर-मलकापूर महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
निष्काळजी ठेकेदाराची चौकशी करून कडक कारवाई करावी आणि रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
आता प्रशासन या मागणीची किती गांभीर्याने दखल घेते आणि रखडलेल्या रस्त्याचे काम कधी सुरू होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
