जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैधरीत्या घातक शस्त्रे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत एका इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटीचे ०१ पिस्तूल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त केली.

शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. विशाल जयसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतील समतानगर जवळील उमा विहार शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात एक इसम अंमलीशस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खात्री करून पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. कारवाईदरम्यान प्रकाश तोलार, रा. खेडी, ता. जळगाव, ह.मु. साई सिटी, जळगाव यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९३/२०२६, आर्म्स ॲक्ट कलम ३/२५(९-B)(a) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विशाल जयसवाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
