दंड न भरलेल्या वाहनमालकांवर प्रशासनाची कारवाई; तहसील कार्यालयात होणार बंद लिफाफा निविदा व सर्वोच्च बोलीद्वारे लिलाव
जळगाव प्रतिनिधी | निलेश खैरनार
जळगाव तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनमालकांनी दंडाची रक्कम शासनजमा न केल्याने प्रशासनाने आता जप्त वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वाहनांवर दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आले होते. मात्र, दंडाची वसुली न झाल्याने शासनाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.

त्यानुसार २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे अटी व शर्तींच्या अधीन राहून बंद लिफाफ्यातील निविदा तसेच सर्वोच्च बोलीद्वारे जप्त वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
लिलावात सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून ते १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, जळगाव येथे स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक वाहनासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये, तर प्रति वाहन ५ हजार रुपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
लिलावातील सर्वोच्च बोलीदाराने बोलीची संपूर्ण रक्कम तीन दिवसांच्या आत शासनजमा करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत रक्कम जमा न केल्यास संबंधिताची ५ हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाहनांची हातची किंमत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी निश्चित केलेली किंमत आणि वाहनावरील प्रलंबित दंडाची रक्कम यापैकी जी रक्कम अधिक असेल ती आधारभूत किंमत राहणार आहे.
लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अर्ज प्रक्रिया, अनामत रक्कम, वाहनांची हातची किंमत तसेच लिलावाच्या अटी व शर्तींबाबत तहसीलदार, जळगाव यांच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
