जळगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; १० हजारांचा दंडही ठोठावला
जळगाव | विभागीय प्रतिनिधी – महेशप्रसाद दिक्षित
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात संपत्तीच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले होते. भावजयीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी दीपक लोटन सोनार याला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

ही धक्कादायक घटना २१ मे २०२१ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता पिंप्राळा येथील मयूर कॉलनी परिसरात घडली होती. संपत्तीच्या कागदपत्रांवरून आरोपी दीपक सोनार आणि त्याची भावजय योगिता सोनार यांच्यात वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारी झाली आणि त्यातून आरोपीने योगिता यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचे अभियोजन पक्षाचे म्हणणे होते. या हल्ल्यात योगिता यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात मृत योगिता यांचा मुलगा आर्यन सोनार हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला. न्यायालयात एकूण १७ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

निकाल ऐकताच मुलाच्या डोळ्यांत अश्रू
न्यायालयात निकाल सुनावताना आईच्या आठवणीने प्रत्यक्षदर्शी मुलगा आर्यन सोनार याला अश्रू अनावर झाले. या निकालामुळे तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी केला.
संपत्तीच्या वादातून घडलेल्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या निकालामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
