बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार.

नाशिक रोड : बोगस शालार्थ आयडी आणि बनावट वैयक्तिक मान्यतेच्या कथित प्रकरणात बीडच्या शिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुंवर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

नाशिक विभागातील कथित शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल १५० ते १७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मार्च २०१९ ते जून २०२५ या कालावधीत काही अधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि संबंधित व्यक्तींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे.

या बनावट आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीतून वेतन आणि थकबाकीच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये काढण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

दरम्यान, तपासादरम्यान किरण कुंवर यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील ११ शिक्षकांच्या कथित बनावट मान्यता आणि शालार्थ आयडी तयार झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, किरण कुंवर यांची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन देणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक अर्थात SIT कडून सुरू आहे. तपास पुढे सरकत असताना कथित घोटाळ्यातील अधिकारी, संस्थाचालक आणि इतर संबंधितांची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

आता किरण कुंवर यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई काय होते आणि या कथित कोट्यवधींच्या घोटाळ्यात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!