गिरीश महाजनांचा मोठा खुलासा; आयुक्तांच्या नाव-डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर, कोट्यवधींच्या फसवणुकीचा संशय

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. :

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा पर्दाफाश करत संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले.

या प्रकरणात महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा तसेच डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. अधिकृत शासकीय निविदा प्रक्रिया न राबवता परस्पर ऑफलाइन वर्क ऑर्डर तयार करून विविध व्यक्तींना देण्यात आल्याचे समोर आले असून, या माध्यमातून फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना जेवण, पाणीपुरवठा, चटया तसेच विविध साहित्य पुरविण्याचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून संबंधितांकडून फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. बनावट आदेशांवर महसूल आयुक्तांचे नाव वापरण्यासोबतच ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

या रॅकेटची व्याप्ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर, धुळे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत असल्याचा संशय असून, काही संशयितांविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. बनावट वर्क ऑर्डर किंवा कंत्राटाचे आमिष दाखवून कोणी पैसे मागत असल्यास नागरिकांनी सावध राहावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!