जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
महापालिकेच्या ट्रॅक्टरच्या चालकाच्या वयावरही प्रश्नचिन्ह; अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
जळगाव : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात पेहलवान शिवाजी पाटील (शिवा) हे जखमी झाले. त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमी शिवाजी पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजता शिवाजी पाटील हे दुचाकीने व्यायामशाळेकडे जात होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमएच.१९.एएन.३१४३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की, त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून शिवाजी पाटील यांच्या हाताला दुखापत झाली.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. त्यानंतर जखमी शिवाजी पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महापालिकेच्या ट्रॅक्टरमुळे अपघात?
दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर जळगाव महानगरपालिकेचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच ट्रॅक्टर चालविणारा चालक अल्पवयीन असल्याचीही प्राथमिक माहिती मिळत असल्याने या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, चालकाचे वय आणि अपघाताची नेमकी कारणे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, या घटनेबाबत अद्याप पोलिसांत अधिकृत नोंद झालेली नसल्याचे समजते.
आरोग्यदूत म्हणून परिचित
शिवाजी पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत तसेच आमदार अमोल जावळे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. त्यांच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर समर्थक व परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या वर्दळीच्या परिसरात झालेल्या या अपघातामुळे वाहतूक सुरक्षा, महापालिकेच्या वाहनांची देखरेख आणि चालकांच्या पात्रतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात अधिकृत तपासानंतर नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
