मुंबई : खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर लाल अक्षरांत ‘POLICE’ किंवा ‘पोलीस’ लिहून रुबाबात फिरणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना आता नियमांचा दणका बसण्याची शक्यता आहे. अशा वाहनांबाबत प्राप्त झालेली तक्रार अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडे पुढील उचित कार्यवाहीसाठी पाठवली आहे.

राज्यात अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार आपल्या खासगी वाहनांवर लाल रंगाची ‘पोलीस’ पाटी लावतात किंवा वाहनावर लाल अक्षरांत ‘पोलीस’ असे लिहितात. अशा वाहनांवर ‘पोलीस’ लिहिलेले असल्यामुळे त्यांची तपासणी अनेकदा होत नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याचाच गैरफायदा घेत अशा वाहनांचा अवैध वस्तूंच्या ने-आणीसाठी गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

सखाराम कुलकर्णी यांनी २७ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना यासंदर्भात पत्र दिले होते. हे पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून २८ जुलै रोजी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानंतर ३१ जुलै रोजी या तक्रारीची मूळ प्रत पुढील उचित कार्यवाहीसाठी राज्यातील संबंधित पोलीस कार्यालयांकडे पाठवण्यात आली.

विशेष म्हणजे, खासगी वाहनांवर अशा प्रकारे ‘पोलीस’ पाटी लावण्याबाबत उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

खासगी वाहनावर ‘पोलीस’ची पाटी किंवा ‘पोलीस’ नाव आढळून आल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १७७ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

या प्रकरणाची प्रत मुंबई, पुणे, जळगांव धुळे पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूरसह राज्यातील पोलीस आयुक्तालये आणि विविध जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयांकडे पाठवण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक (मुख्यालय) डॉ. सुनील भारद्वाज यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे.

त्यामुळे खासगी वाहनावर ‘POLICE’ची लाल पाटी लावून फिरणे आता अडचणीचे ठरू शकते. संबंधित यंत्रणांकडून प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यास राज्यभरातील अशा खासगी वाहनांवरील ‘पोलीस’ पाट्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!