कालकथित महेंद्र नलावडे यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी, विशेष वृत्तांत
समाजातील दिव्यांग बांधवांना आवश्यक सुविधा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सावली सहयोग संस्थेच्या वतीने कालकथित महेंद्र नलावडे यांच्या स्मरणार्थ विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला दिव्यांग बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी मोफत फोल्डरचे वाटप करण्यात आले. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना मोफत टी-शर्टचे वितरण, तर नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली.
यावेळी महिलांवरील अन्याय-अत्याचाराला प्रतिबंध, महिलांचे कायदेशीर हक्क आणि उपलब्ध कायदेशीर संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे उपस्थित महिला व नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी महत्त्वाची माहिती मिळाली.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना, आवश्यक सुविधा आणि कायदेशीर मार्गदर्शन पोहोचावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या समाजहिताच्या उपक्रमाचे आयोजन सावली सहयोग संस्थेचे अध्यक्ष आयु. राजेश घोलप यांनी केले. तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे सचिव आयु. अनिल घोडके आणि खजिनदार श्रीमती पूजा सावंत यांनी केले.
दिव्यांग बांधवांसाठी तसेच समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे हीच महेंद्र नलावडे यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
